उदगीर / प्रतिनिधींनी
उदगीर नगरपालिकेच्या होवू घातलेल्या निवडणुकांची रंगत दिवसेंदिवस वाढत असून विविध पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेग घेत आहे. याच पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष आदर्श (सोनू) पिंपरे यांनी प्रभाग क्रमांक 9 मधून काँग्रेस पक्षाकडून आपला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या अर्ज दाखल कार्यक्रमाला स्थानिक कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती दिसून आली. प्रभाग क्रमांक 9 मध्ये गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत उत्सुकता होती. अखेर पक्षाने आदर्श पिंपरे यांच्यावर विश्वास दाखवला असून त्यांच्या उमेदवारीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आपल्या तरुण नेतृत्वगुणांमुळे आणि सामाजिक सहभागामुळे पिंपरे यांनी अल्पावधीत मतदारांमध्ये चांगली ओळख निर्माण केली आहे. स्थानिक स्तरावर पिंपरे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली असून मतदारांचा कलदेखील त्यांच्याकडे झुकत असल्याचे चित्र दिसत आहे. विविध भागात घेण्यात आलेल्या संवादातून अनेक मतदारांनी पिंपरे यांच्या काम करण्याच्या उत्साहाचे आणि लोकसंपर्काचे कौतुक केले आहे. “आदर्श ( सोनू ) पिंपरे हे तरुण, ऊर्जावान आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे व्यक्तिमत्त्व आहे. आम्ही त्यांनाच मतदान करू,” असे मतदारांकडून व्यक्त केले जात आहे.पक्षाच्या स्थानिक नेतृत्वानेही पिंपरे यांच्या उमेदवारीचे स्वागत करत त्यांच्या विजयाबद्दल आशावादी भूमिका व्यक्त केली आहे. निवडणुका जशा जवळ येत आहेत, तसतसा प्रभाग क्रमांक 9 मधील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे. आगामी प्रचार मोहीम, पक्षांची रणनीती आणि मतदारांचा अंतिम कल यावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.