उदगीर / प्रतिनिधी
उदगीर नगर परिषद निवडणुकांना आता वेग आला असून निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा म्हणजेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 17 नोव्हेंबर झाली आहे. अंतिम दिवशी विविध पक्षांचे उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होत असताना प्रभाग क्रमांक 20 मधून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक राजू भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. त्यांच्या अर्जामुळे प्रभागातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे.राजू भोसले हे अनेक वर्षांपासून नगरसेवक म्हणून कार्यरत असून प्रभाग क्र. 20 मध्ये त्यांनी केलेल्या विविध कामांमुळे त्यांना मतदारांमध्ये चांगला पाठिंबा मिळत आसल्याचे दिसत आहे. रस्त्यांची दुरुस्ती, पाणीपुरवठा सुधारणा, स्वच्छता व्यवस्थेतील बदल, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे अशा अनेक मूलभूत कामांना त्यांनी प्राधान्य दिले आहे. त्यांच्या या कार्यशैलीमुळे प्रभागातील रहिवाशांमध्ये त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू असून त्यांच्याबद्दल समाधानाचे सूर उमटत आहेत. अर्ज दाखल करताना राजू भोसले यांच्यासोबत काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी बोलताना त्यांनी आगामी काळात प्रभागाचा विकास अधिक गतीने करण्याचा संकल्प व्यक्त केला. “या प्रभागातील नागरिकांनी मला नेहमीच साथ दिली आहे. विकासकामांचा वेग वाढवणे, अपुरी सुविधा दुरुस्त करणे आणि नवीन उपक्रम राबवणे हे माझे ध्येय आहे,” असे त्यांनी सांगितले. प्रभाग क्रमांक 20 मध्ये यंदाची निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता दिसत असून मतदार राजू भोसले यांच्या कामगिरीबद्दल मिश्र पण सकारात्मक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता प्रचार मोहीम अधिक वेग घेणार असून पुढील काही दिवसांत निवडणुकीचे वातावरण आणखी तीव्र होण्याची चिन्हे स्पष्ट होत आहेत.