उदगीर शहरातील सर्वसामान्य नागरिकांना आज प्रशासनाच्या निष्क्रियतेचा आणि भ्रष्टाचाराचा सर्वाधिक फटका बसत आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करून सत्ताधाऱ्यांनी केवळ स्वार्थ आणि लूट यांचीच संस्कृती निर्माण केली आहे.
शहरात सर्वत्र पसरलेला कचरा, वाढती वाहतूक कोंडी, पाणीपट्टीच्या नावाखाली सुरू असलेली लूट, आणि विविध अवैध धंद्यांना मिळणारा राजाश्रय — या सर्व गोष्टींनी उदगीरकर त्रस्त झाले आहेत. जनतेला न्याय मिळावा आणि शहराला पारदर्शक व जबाबदार प्रशासन मिळावे, यासाठी आता आवाज उठवण्याची वेळ आली आहे, असे मत युवक काँग्रेस उदगीर शहराध्यक्ष आदर्श (सोनू) पिंपरे यांनी व्यक्त केले.
त्यांनी पुढे सांगितले की — “शहरातील नागरिकांना कोणत्याही कामासाठी प्रशासकीय कार्यालयात गेल्यावर लाच आणि दलालीची साखळी अनुभवावी लागते. लोकशाही संस्थांवरचा जनतेचा विश्वास डळमळीत होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी काँग्रेस पक्षच एकमेव पर्याय आहे.”
आ. अमित देशमुख साहेब, प्रदेश सचिव कल्याण पाटील साहेब, व शहराध्यक्ष मंजूरखा पठाण साहेब, शिवाजी अण्णा हुडे, प्रितीताई भोसले यांच्या नेतृत्वात, जनतेच्या आशीर्वादाने युवक काँग्रेसने परिवर्तनाची दिशा ठरवली आहे. जिल्हाध्यक्ष प्रवीण बिरादार, तालुकाध्यक्ष विवेक पंडितराव जाधव आणि उदगीर तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने युवक काँग्रेस शहरातील प्रत्येक वॉर्डात लोकांच्या समस्या ऐकून त्यासाठी लढणार आहे.
“आमचे ध्येय सत्तेची लालसा नसून, जनतेचा सन्मान आणि प्रशासनातील पारदर्शकता हे आहे. आम्ही नागरिकांसोबतच या लुटखोरी आणि भ्रष्टाचाराविरोधात उभे राहणार आहोत. येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा विजयाचा तिरंगा नगरपरिषद भवनावर फडकवूनच थांबणार नाही, तर या शहराला सुशासनाचे आदर्श मॉडेल बनवू,” असा ठाम निर्धार आदर्श (सोनू) पिंपरे यांनी व्यक्त केला.