नांदेड :- उध्दव सरोदे -
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालय नांदेड येथे शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागातर्फे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.विना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इमर्जिंग पॅराडाइम अँड इनोव्हेशन्स इन योगा,फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स सायन्सेस या विषयावर राष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न झाली.या राष्ट्रीय परिषदेत राष्ट्रीय स्तरावरील एकूण ८ राज्यातील विविध विद्यापीठ, महाविद्यालय यामधील क्रीडा संचालक,प्राध्यापक,संशोधक,क्रीडा प्रेमी तसेच इतर विषयातील प्राध्यापक यांनी सक्रिय सहभाग घेतला.या परिषदेची सुरुवात पारंपरिक द्विप प्रज्वलन करून उद्घाटनाने झाली.त्यानंतर प्राचार्या प्रा.डॉ.विना पाटील यांनी विचार मंचावर उपस्थित परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष,उद्घाटक व सर्व साधन व्यक्ती आदिंचा शाल,पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लेख प्रकाशित नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले.प्राचार्या डॉ. वीणा पाटील यांनी त्यांच्या प्रास्ताविक भाषणामध्ये महाविद्यालयाचा गौरवशाली इतिहास मांडत महाविद्यालयातील विविध शैक्षणिक उपक्रम तसेच परिषद आयोजित करण्या मागची भूमिका स्पष्ट करीत उपस्थित सर्वांचे शब्दसुमनाने स्वागत केले.या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.श्री डी.पी.सावंत,माजी उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री तथा सचिव श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी यांची विशेष उपस्थिती होती.यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ.मनोहर चासकर यांनी उद्घाटनपर मुख्य भाषण करीत उपस्थितांना मार्गदर्शन केले.मा.डी.पी.सावंत यांनी अध्यक्षीय भाषण प्रसंगी दैनंदिन जीवनामध्ये योगाचे महत्व विशद करत विद्यार्थ्यांना विविध खेळात व स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रेरित करावे असे आव्हान उपस्थित क्रीडा शिक्षकांना केले तसेच योग आणि व्यायाम नियमित जीवनाचा भाग व्हावा अशी सदिच्छा व्यक्त केली.यावेळी एकूण चार सत्रांमध्ये राष्ट्रीय परिषदेच्या विषयावर अभ्यासपूर्ण चर्चा करण्यात आली. प्रस्तुत राष्ट्रीय परिषद हि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आली होती.राष्ट्रीय परिषदेसाठी डॉ.अरविंद मलिक, क्रीडा संचालक क्रीडा विभाग, कुरुक्षेत्र विद्यापीठ हरियाणा,डॉ.रीना पुनिया,क्रीडा संचालक,मणिपाल विद्यापीठ जयपुर,डॉ.माधुरी सदगीर, सहयोगी प्राध्यापक,क्रीडा विभाग मुंबई विद्यापीठ तसेच डॉ.व्ही.साई अभिनव,सहयोगी प्राध्यापक,शिक्षण विभाग,कर्नाटक विद्यापीठ आदि साधन व्यक्ती म्हणून उपस्थित राहून इनोवेशन इन योगा,स्ट्रेस मॅनेजमेंट, महिला सक्षमीकरण,क्रीडा क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा वापर तसेच शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी खेळाचे महत्व इत्यादी विषयावर त्यांनी सखोल विचार व्यक्त करीत मार्गदर्शन केले.तर पाचव्या क्षेत्रामध्ये सहभागी प्राध्यापकांनी त्यांचे संशोधन लेख वाचन केले.सदर परिषदेमध्ये जवळपास 125 संशोधन लेख प्रकाशित करून उपस्थितांना प्रकाशित पीअर रिव्ह्यू जर्नल व सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले.
सायंकाळच्या शेवटच्या सत्रामध्ये समारोप कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी मा.श्री.नरेंद्रदादा चव्हाण, कार्यकारणी सदस्य,श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी व व्यवस्थापन परिषद सदस्य स्वा.रा.ती.म.विद्यापीठ यांची उपस्थिती होती.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.अशोक महाजन यांनी मार्गदर्शन केले.यावेळी विचार मंचावर प्रा. डॉ.चंद्रकांत बाविसकर,अंतर विद्याशाखेचे अधिष्ठाता यांची उपस्थिती होती.प्राचार्या डॉ.विना पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले तर परिषदेचे आयोजक सचिव डॉ.चरणजीतसिंघ महाजन, क्रीडा संचालक यांनी उपस्थित मान्यवर,साधन व्यक्ती,सहभागी क्रीडा प्राध्यापक,संशोधक व महाविद्यालया तील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार मानले. सदरील राष्ट्रीय परिषदेचा समारोप राष्ट्रगीताने होवून सदरचे राष्ट्रीय चर्चासत्र नियोजनबद्ध रित्या करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेवून राष्ट्रीय परिषद यशस्वीरित्या पार पाडली.