उदगीर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 10 मधून निवृत्ती सांगवे यांची उमेदवारी जाहीर
• संपादक - मंगेश संग्राम सुर्यवंशी
उदगीर / प्रतिनिधी
उदगीर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 10 मधून श्री. निवृत्ती सांगवे यांनी आगामी निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून आपली उमेदवारी जाहीर केली आहे. सामाजिक कार्याची ओळख असलेले सांगवे हे यापूर्वी नगरसेवक पद भूषवून नागरिकांच्या विविध प्रश्नांवर सक्रियपणे काम केलेले आहेत.
सांगवे यांनी नगरसेवक पदावर असताना परिसरातील मूलभूत सोयीसुविधांच्या उभारणीसाठी प्रयत्न केले. तसेच शिक्षण, स्वच्छता, आरोग्य व सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. प्रभागातील नागरिकांशी सतत संपर्कात राहून त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न त्यांनी केला.सांगवे यांनी आपल्या उमेदवारीविषयी बोलताना सांगितले की, “जनतेचा विकास आणि नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणे हेच माझे ध्येय आहे. नगर परिषदेमार्फत अधिक परिणामकारक कार्य घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील राहीन.”
निवृत्ती सांगवे यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 10 मधील निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत. स्थानिक पातळीवर त्यांच्या सामाजिक कार्याचा आणि लोकसंपर्काचा अनुभव लक्षात घेता त्यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.