उदगीर (प्रतिनिधी)
उदगीर विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमधील शेतकऱ्यांचे स्वप्न उद्ध्वस्त झाले आहे. शेत जमिनी पूर्ण खरवडून गेल्या आहेत. त्यामुळे समाजातील सर्वच घटकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून गेल्या आहेत, शासन नियमाने खरवडून गेलेली जमीन या पोट खराब मध्ये नोंद घेतात. त्यामुळे ती अट यावर्षी पुरती शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी युवा नेते स्वप्निल अण्णा जाधव यांनी केली आहे.
यावर्षी पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतीत माती शिल्लक राहिली नाही, पीक शिल्लक राहिले नाही. केवळ खडकाळ जमीन बनून गेलेली आहे. या गोष्टीची पाहणी महसूल प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांनी आणि काही राजकीय पुढार्यांनी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान द्यावे, आणि त्यांच्या जमिनीला पोट खराब नोंदी न करता सरसकट अर्थसाह्य करावे .अशी ही मागणी स्वप्निल अण्णा जाधव यांनी केली आहे.
शासनाने तुटपुंजे अनुदान जाहीर केले आहे. या अनुदानाने शेतीला पूर्ववत करता येणार नाही, नुकसान भरून निघणार नाही. पण यावर्षी जवळपास हजारो हेक्टर जमीन खरवडून गेली असल्यामुळे शासनाची असलेली जाचक अट सातबारा वरती पोट खराब नोंदी घेण्यात येऊ नयेत. त्यासाठी तात्काळ प्रशासनाच्या स्तरावरून नियोजन करण्यात यावे. आणि पूरग्रस्तांना दिलासा देण्याची मागणी स्वप्निल अण्णा जाधव यांनी केली आहे. संपूर्ण मराठवाड्यामध्ये पावसाने थैमान घातले आहे. पावसाच्या या थैमानामुळे शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले आहे, त्यामुळे तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा. त्यासोबतच शेतीच्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांची ई पीक पाहणी अट रद्द करावी. अशी ही मागणी स्वप्नील अण्णा जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अगोदरच अतिवृष्टीमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आता ईपीक पाहाणीची जाचक अट मारक ठरत आहे. शेतात जाण्यासाठी रस्तेच शिल्लक नसल्याने, शेतकऱ्यांनी शेतात जाऊन ईपीक पाणी कशी करावी? असा प्रश्नही स्वप्निल अण्णा जाधव यांनी उपस्थित केला आहे. काही ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत, तर काहींना जाण्यासाठी नदी नाले ओलांडून जावे लागत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी जीव धोक्यात घालून पिकात जाऊन केलेले ई-पीक पाहणीचा ओटीपीच येत नसल्याने मोठी डोकेदुखी होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली आहे, त्यालाच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत मिळणार, तसेच हमीभावाने शेतीमाल खरेदी करण्यासाठी ही अट असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे, त्यामुळे अगोदरच अतिवृष्टीत मार खाल्लेल्या शेतकरी आता या जाचक अटी मुळे अडचणीत सापडला आहे. शासनाने मदतीच्या नावाने शेतकऱ्याची थट्टा सुरू केली आहे. ही थट्टा तात्काळ थांबवावी, आणि प्रति हेक्टर 50 हजार रुपये पंजाब सरकार प्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही द्यावेत. अशीही आग्रही मागणी स्वप्निल अण्णा जाधव यांनी केली आहे. तसेच सरसकट पीक विमा मंजूर करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी. कर्जमाफी शिवाय शेतकऱ्यांना धीर मिळणार नाही. कारण होत्याचे नव्हते झाल्यामुळे जगणे कठीण झाले असताना कर्ज कुठून फेडणार? जिथे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, तिथे अतिरिक्त खर्च शेतकरी कुठून करणार? उपजीविका कशी भागवणार अशा एक ना अनेक प्रश्नांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना जाचक अटी न लावता सरसकट मदत करावी. अशीही मागणी युवा नेते स्वप्निल अण्णा जाधव यांनी केली आहे.