उदगीर, (प्रतिनिधी): जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथील हजरतबल दर्ग्यात भारताचे राष्ट्रीय चिन्ह असलेल्या अशोक स्तंभाची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडचे उदगीर तालुकाध्यक्ष शिवश्री राजकुमार भालेराव यांच्या नेतृत्वाखाली उदगीर तहसील कार्यालयात तहसीलदार साहेबांना निवेदन सादर करण्यात आले. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तात्काळ व कठोर कारवाईची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या ईद-ए-मिलाद निमित्ताने हजरतबल दर्ग्याच्या कोनशिलेवर भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोरण्यात आले होते. परंतु, काही समाजकंटकांनी धार्मिक भावना दुखावल्याचा दावा करत या कोनशिलेची विटंबना केली. भारताच्या राष्ट्रीय चिन्हाचा अशा प्रकारे अपमान करणे, हा केवळ कायद्याचा भंग नाही, तर देशाच्या सार्वभौमत्वावर केलेला हल्ला आहे. राष्ट्रीय चिन्ह हे देशाच्या अस्मितेचे प्रतीक असून त्याचा सन्मान राखणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे, असे संभाजी ब्रिगेडने आपल्या निवेदनात स्पष्ट केले.
संभाजी ब्रिगेडने या राष्ट्रविरोधी कृत्याचा तीव्र निषेध करत शासनाकडे प्रमुख तीन मागण्या केल्या आहेत.
१. अशोक स्तंभाची विटंबना करणाऱ्या दोषींवर तात्काळ व कठोर कारवाई करावी.
२. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी राष्ट्रीय चिन्हाच्या सन्मानासाठी अधिक कठोर कायदे व नियमांची अंमलबजावणी करावी.
३. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून यामागे असलेल्या संघटना व व्यक्तींचा पर्दाफाश करावा.
यावेळी निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष शिवश्री राजकुमार माने, जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री बाळासाहेब चिंचोलकर, जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री श्रीधर जाधव, जिल्हा संघटक शिवश्री मेहबूब सय्यद, तालुका उपाध्यक्ष शिवश्री धम्मसागर सोमवंशी, तालुका कार्याध्यक्ष शिवश्री नरसिंग बनशेलकीकर, तालुका सचिव शिवश्री सावन तोरणेकर, तालुका सह-सचिव दीपक गायकवाड, तालुका सह-कार्याध्यक्ष श्याम वाघमारे, तालुका संघटक शिवश्री सुरज आटोळकर, शहर अध्यक्ष बंटी घोरपडे यांच्यासह राजरत्न कांबळे, नामदेव चव्हाण, काकडे, उमाकांत व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.