उदगीर (प्रतिनिधी)
उदगीर शहरांमध्ये विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा नांदेड बिदर रस्त्यावर चौकात बसवला जावा, अशी प्रमुख मागणी करून त्यावेळेसचे क्रांती नायक यशवंत शिंदे यांनी कित्येक वेळा आमरण उपोषण केले होते. कित्येक वेळा आंदोलन केली होती. त्यानंतर याच मागणीला पुढे रेटण्याचे काम अनेक समाज मार्तंड यांनी केले. मात्र दुर्दैवाने सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणतात, त्या पद्धतीने हे आंदोलन चिरडून टाकून रस्त्याच्या एका कडेला विश्वभूषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसवला गेला. वास्तविक पाहता त्या ठिकाणी आता कोणताही चौक नाही, तर पुतळा एका कोनाड्यात गेला आहे. त्यावेळेस किमान त्या पुतळ्याच्या समोर मुख्य रस्त्यावर अशोक स्तंभ उभारण्याची समाज बांधवांची मागणी विचारात घेऊन तत्कालीन मंत्र्यांनी त्यास मंजुरीही मिळवली होती. मात्र दुर्दैवाने कुठे माशी शिंकली ? कळायला मार्ग नाही. मात्र आता तो अशोक स्तंभ उभारला गेला नसल्याने जनसामान्यांना लोकप्रतिनिधीने दिलेले आश्वासन पूर्ण व्हावे, या उद्देशाने काँग्रेस पक्षाचे युवा नेते आदर्श पिंपरे यांच्यासह भागवत तलवारे, सुनील कांबळे, प्रवीण मस्के यांनी आमरण उपोषण करून अशोक स्तंभ रस्त्याच्या मध्यभागी उभा करावा अशी मागणी केली आहे.
या पूर्वीही लेडी पॅंथर मायाताई कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले होते. मात्र दुर्दैवाने त्या त्यावेळी आंदोलन चिरडण्यात सत्ताधाऱ्यांना यश आले. हे समाजाचे दुर्दैव आहे. असे विचार स्वप्निल अण्णा जाधव यांनी व्यक्त केले आहेत.
वास्तविक पाहता समाजासाठी जे लढतात, त्यांचा लढा मोडीत काढण्यासाठी राजकारणी लोक साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर करून समाजामध्ये फूट पाडतात, आणि आपली पोळी भाजून घेतात. तसाच प्रकार त्यावेळेसही झाला होता. मात्र आता युवकांनी कठोर निर्धार करून आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. ही कौतुकाची बाब आहे. आणि समाजाने त्यांच्या आंदोलनाला साथ द्यावी, असे आवाहनही युवा नेते स्वप्निल अण्णा जाधव यांनी केले आहे.