सामाजिक नीतीमूल्यांची शिकवण देणारी योजना म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना होय प्रा. दिलीप पवार


 कडेगांव दि. 27 (प्रतिनिधी)

  खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असे सांगून सामाजिक नीतीमूल्यांंची शिकवण देऊन राष्ट्र उभारणीच्या कार्यासाठी सतत तत्पर असणारी महाविद्यालयीन स्तरावर शिकवण देणारी योजना म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना होय, असे प्रतिपादन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. दिलीप पवार यांनी केले.

                  ते आर्ट्स ॲण्ड कॉमर्स कॉलेज कडेपूर येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद् घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. बापूराव पवार हे होते. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. राजेंद्र महानवर यांनी केले. 

             राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण भारतामध्ये महाविद्यालयीन स्तरावरती  युवकांच्यामध्ये राष्ट्रप्रेम  व श्रमाचे संस्कार होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना सुरू करण्यात आली, असे सांगून प्रा. दिलीप पवार पुढे म्हणाले की, सध्या 8 लाखा पेक्षा जास्त विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी होऊन समाजामध्ये सामाजिक बांधिलकी व सेवाभाव निर्माण करण्याचे कार्य करीत आहेत, असेही. ते. शेवटी म्हणाले.

                यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य मा. बापूराव पवार म्हणाले की,  Not me, but you’ माझ्यासाठी नव्हे, तर तुमच्यासाठी' असे राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीद वाक्य असून या ब्रीद वाक्याप्रमाणे महाविद्यालयीन युवक सामाजिक स्तरावरती काम करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या ठिकाणी असलेल्या सुप्त गुणांचा शोध घेऊन त्यांच्यामध्ये नेतृत्वगुणाचा विकास घडवून

युवकांना राष्ट्र विकासाच्या प्रक्रियेमध्ये उस्फूर्तपणे सहभागी करुन घेण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना महत्वाची आहे, असे सांगून प्राचार्य बापूराव पवार शेवटी म्हणाले की,  ‘खेड्याकडे चला’ हा महात्मा गांधीचा विचार घेऊन गावांमध्ये, समाजामध्ये मानवतेचे राज्य आणायचे असेल तर आजच्या युवकांमध्ये विद्यार्थी जीवनापासूनच राष्ट्रीय सेवा योजनेचे संस्कार झाले पाहीजेत असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सूरज डुरेपाटील यांनी तर शेवटी आभारप्रदर्शन प्रा. डॉ. सौ. अरुणा कांबळे यांनी केले. कार्यक्रमास जेष्ठ प्रा. दत्तात्रय होनमाने, राष्ट्रीय सेवा योजनेचे सदस्य प्रा. कुमार इंगळे यांच्यासह प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.