लातूर प्रतिनिधी
शिक्षक हे राष्ट्रनिर्माते असून पिढ्या न पिढ्या ज्ञानदानाचे काम करत असून संस्कारी पिढ्या घडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. लातूर जिल्हा परिषदेत 5300 च्या आसपास शिक्षक असून त्या सर्वांचा सन्मान झालाच पाहिजे. तसेच शिक्षक बांधवाना नौकरी करत असताना प्रमोशनची संधी मिळाली पाहिजे या हेतूने 12 शिक्षण विस्तार अधिकारी व 55 मुख्याध्यापक या पदावरती प्रमोशन देऊन सन्मान करण्यात आला आहे. अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडलेल्या या प्रमोशन प्रक्रियेमुळे, कोणाचीही तक्रार आली नाही.असेही राहुल केंद्रे यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेमध्ये आज माजी राष्ट्रपती, मिसाईलमॅन डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली.प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे, उपाध्यक्ष भारतबाई साळुंके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी,उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव,शिक्षणाधिकारी वैशाली जामदार, शिक्षण समिती सदस्य अंकुश कोणाळे यांनी अभिवादन केले.वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.प्रमोशन झालेल्या विस्तार अधिकारी व मुख्याध्यापक यांना जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे,उपाध्यक्ष भारतबाई सोळंके यांच्या हस्ते आदेश देण्यात आले. तसेच मनासारख्या जागा मिळाल्यामुळे शिक्षक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले असून सर्व स्तरावरून या प्रक्रियेचे स्वागत होताना दिसून येत आहे.