उदगीर / प्रतिनिधी
उदगीर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गजानन अशोकराव पाटील रातोळीकर यांनी गडचिरोली जिल्ह्यात साडेतीन वर्ष केलेल्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर झालेले आहे. पोलीस उपनिरीक्षक गजानन अशोकराव पाटील रातोळीकर यांनी सन २०१४ ते २०१७ या दरम्यान तीन ते साडेतीन वर्ष नक्शलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील जिमलगठा पोलीस मदत केंद्र संवेदनशील असलेल्या तालुक्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. तसेच आहेरी-प्राणहिता जि.गडचिरोली येथे बॉम्ब शोधक व नाशक पथक प्रमुख म्हणून काम करताना ११ ठिकाणी जिवंत बॉम्ब शोधून काढुन त्यांनी नष्ट केले. हे विशेष काम व कार्ये त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून केले. त्यांनी केलेल्या तेथील कौतुकास्पद कार्याबद्दल केंद्रीय गृह विभाग आणि महाराष्ट्र पोलीस महासंचालक यांचेकडून त्यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर झाले आहे. त्याबद्दल त्यांचे पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, उपविभागीय पोलिस अधिकारी मधुकर जवळकर, पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, सर्व पोलीस उपनिरीक्षक, जमादार, ठाणेअमंलदार, हेडकॉन्स्टेबल, पोलीस कर्मचारी, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई शाखा उदगीर चे तालुकाध्यक्ष पत्रकार बाळासाहेब शिंदे आदींनी अभिनंदन केले आहे.