उदगीर तालुक्यात अज्ञात इसमाचा खून
उदगीर /प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील शेकापुर- देवर्जन रस्त्यावर कुमदाळ शिवारात एका अज्ञात व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकण्यात आला आहे. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दिनांक 17 जून रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कुमदाळच्या पोलीस पाटलांनी दिलेल्या माहितीवरून उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपक कुमार वाघमारे आपल्या पोलिस पथकासह घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. खून झाल्याची खात्री होताच, उपविभागीय पोलिस अधिकारी मधुकर जवळकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव यांना माहिती कळवली. तेव्हा या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळ पंचनामा करण्यात आला. मयत व्यक्ती हा 20 ते 25 वयोगटातील असावा. असा अंदाज पोलिसांचा असून जिल्ह्यातील कोणत्या पोलीस स्टेशन मध्ये या वयोगटातील कोणी व्यक्ती मिसिंग असेल तर त्यांनी तात्काळ उदगीर ग्रामीण पोलिसांशी संपर्क करावा. असे आवाहन उदगीर ग्रामीण पोलिसांनी केले आहे.