मातृत्वाच्या भूमिकेतून दातृत्व दाखवा- सौ ज्योतीताई बापूराव राठोड
उदगीर/ प्रतिनिधी
सध्या देश कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे मोठ्या अडचणीत सापडला आहे. शासनाच्या वतीने शक्यतो सर्व गरजु पर्यंत अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी प्रयत्न चालवला आहे. असे असले तरी, आपल्या भागातील उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरपरिषद दाल, मिल संघटना, माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेश्वर निटुरे, डॉक्टर रामप्रसाद लखोटिया, गुनाई शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा लातूर जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन माजी सभापती बापूराव राठोड ,नगरसेवक दत्ता पाटील, रोटी कपडा बँक, विश्व हिंदू परिषद, कारॅंवा फाउंडेशन यांच्यासोबतच बोके रेड्डी परिवाराने सढळ हाताने गोरगरिबांसाठी अन्नधान्याचे किट तसेच अर्थसाह्य केले आहेत. सुरुवातीला एकविस दिवसाचा लॉक डाऊन चा काळ होता, म्हणून या दानशूर व्यक्तींनी पंधरा दिवस पुरेल एवढा साठा दिला होता. मात्र आता पुन्हा लॉक डाऊन चा दुसरा टप्पा सुरू झाल्याने गोरगरीब आणि मध्यम वर्गीय मोठ्या अडचणीत सापडले आहेत. रोजगार नाही, कामधंदा नाही, त्यामुळे हातात पैसा नाही. हातात पैसा नाही म्हणून बाजारातून काही आणता येत नाही. अशा दुष्टचक्रात सापडलेल्या गोरगरीब जनतेसाठी पुन्हा एकदा दानशूर व्यक्तींनी पुढे यावे. मातृत्वाच्या भावनेतून आपले दातृत्व दाखवावे. असे आवाहन लातूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ. ज्योती ताई बापूराव राठोड यांनी केले आहे. निवडणुकीच्या काळात ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधींनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मार्फत प्रत्येक घरापर्यंत जाऊन प्रचार केला होता. त्याच पद्धतीने एक स्वयंसेवकांची टीम तयार करून ज्या कुणाला गरज असेल त्या घरापर्यंत आर्थिक मदत करावी. जेणेकरून केवळ निवडणुकीसाठीची नाही तर इतर वेळा देखील आपण जनतेसोबत आहोत. हे दाखवून द्यावे. एका अर्थाने आपण जनतेचे मातृत्व स्वीकारावे आणि आपले दातृत्व दाखवावे असेही आवाहन सौ. ज्योतीताई राठोड यांनी केले आहे. मध्यमवर्गीय माणूस सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे. धड भीक मागता येत नाही आणि शासनाला त्यांची अडचण कळत नाही. म्हणजेच आई जेवायला वाढत नाही आणि बाप भीक मागू देत नाही. अशी अवस्था या मध्यमवर्गीय लोकांची झालेली आहे. त्यांचा सविस्तर सर्वे करून त्यांच्यापर्यंत मदत पोहोचता करण्यासाठी स्वयंसेवकांची टीम तयार करावी. जेणेकरून एक सुसूत्रता येईल . आणि जे गरजू असतील त्यांच्यापर्यंत मदत पोहोचता होईल. शासनाच्या वतीने गरीब लोकांसाठी तांदूळ वाटप सुरू केले आहे. मात्र ज्यांची नावे राशन कार्ड मध्ये नाहीत अशांसाठी प्राधान्यक्रम देऊन लोकप्रतिनिधींनी मदतीचा हात पुढे करावा. असेही आवाहन याप्रसंगी सौ. ज्योतीताई इ बापूराव राठोड यांनी केले आहे.मुख्यमंत्री फंड,प्रधान मंत्री फंडासाठी देखील दानशुर व्यक्तींनी पुढे येऊन सढळ हाताने मदत करावी,देश अडचणीत आहे.देशभक्ती आणि प्रेम दाखवण्याची ही संधी आहे.असेही सौ.राठोड यांनी सांगीतले.