उदगीर (प्रतिनिधी)
संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीने हा:हा:कार माजवला असताना, उदगीर तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेष करून धडकनाळ, बोरगाव या गावातील शेतीसहित पिके वाहून गेली. घराघरात पाणी शिरले, अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. शेतकरी अक्षरशः नागवला गेला, शेतातली मातीही वाहून जाऊन खडक उरला. तीच अवस्था शेजारच्या जळकोट तालुक्यातील आहे. मात्र या दोन्ही तालुक्यांना शासनाच्या वतीने अतिवृष्टी नुकसान म्हणून दिली जाणारी मदत अत्यंत तोकडी आहेत. रडक्याचे डोळे पुसल्यागत ही मदत असून शेतकऱ्यांना भरीव मदत द्या. अशी आग्रही मागणी युवा नेते स्वप्निल अण्णा जाधव यांनी केली आहे.
महाराष्ट्रासह लातूर जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असताना, संपूर्ण जिल्ह्यासाठी 244 कोटी 35 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. यामध्ये उदगीर तालुक्यातील 52 हजार 7 83 शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या मोबदल्यात शासनाकडून फक्त तीस कोटी 69 लाख इतकीच मदत मिळाली आहे. ही मदत अत्यंत कमी असून शेतकऱ्यांना जगणे मुश्कील होणार आहे. शेतातील पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत, शेतकऱ्यांची पीकच नाही तर स्वप्न उद्ध्वस्त झाली आहेत. अशा परिस्थितीत शासनाकडून भरीव मदतीची अपेक्षा होती. किमान शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या प्रमाणात तरी मदत अपेक्षित होती, मात्र सापत्न भावाची वागणूक देत लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यामध्ये 46,183 शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांच्यासाठी 31 करोड 75 लाख एवढी मदत आहे. अर्थात ही मदत देखील कमी आहेत, मात्र उदगीरच्या मानाने ती रक्कम जास्त आहे. ज्या तालुक्यात शेतकऱ्यांचे नुकसानीची संख्या कमी आहे, त्या तालुक्यात जास्त निधी आणि उदगीर साठी कमी निधी हा अन्याय कशासाठी? असाही प्रश्न स्वप्नील अण्णा जाधव यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री महोदय देखील उदगीर तालुक्याला उपेक्षित ठेवून पाहणे दौऱ्याच्या निमित्ताने फक्त भाजपच्या आमदारांच्या मतदारसंघात जात आहेत, मित्र पक्षाच्या आमदारांना का उपेक्षित ठेवले गेले आहे? असाही प्रश्न स्वप्नील अण्णा जाधव यांनी उपस्थित केला आहे.
शासनाच्या वतीने दुसरा टप्पा येणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या टप्प्यात ज्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, ज्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्या तालुक्याला उपेक्षित ठेवले जाऊ नये, अशी विनंती ही स्वप्निल अण्णा जाधव यांनी शासनाला पाठवलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
सध्या शेतकऱ्यांच्या संदर्भात आसमानी आणि सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडलेला सर्वात महत्त्वाचा घटक असलेला बळीराजा आज उदासीन झाला आहे. आपली स्वप्न धुळीला मिळताना पाहून अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. अनेकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. हे चित्र फार विदारक आहेत. उदगीर तालुक्यात जेव्हा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचे नुकसान झाले त्यावेळेस कोणत्याही मोठ्या राजकीय नेत्यांनी या गोष्टीचे गांभीर्य विचारात घेतले नाही, किंवा त्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी मदतीचा हातही दिला नाही. असाही आरोप स्वप्निल अण्णा जाधव यांनी केला आहे.
आज जरी अन्याय झाला असला तरी किमान दुसऱ्या टप्प्यात उदगीर, जळकोटला प्राधान्य द्यावे. जळकोट तालुक्यासाठी तर केवळ 13 कोटी 26 लाख रुपये मदत जाहीर झाली आहे. ही देखील अत्यंत कमी आहे. अशी ही खंत स्वप्निल अण्णा जाधव यांनी व्यक्त केली आहे.
निवडणुकीच्या पूर्वसंध्येला बेंबीच्या देठापासून ओरडू ओरडू शेतकऱ्यांचा सातबारा कोरा, अशा घोषणा करणाऱ्या सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी सत्तेवर येताच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला ठेंगा दाखवला आहे. आणि कर्जमाफी करणे शक्य नाही, शेतकऱ्यांनी कर्जाचे पैसे तात्काळ बँकेत जमा करावेत. असा आदेश दिला होता. अशा पद्धतीच्या दुतोंडी सरकार बद्दल स्वप्निल अण्णा जाधव यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. आणि शेतकऱ्यांना न्याय नाही मिळाल्यास नाईलाज म्हणून आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल. असाही इशारा दिला आहे.